सिंधुदुर्गातील वनसंपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची गरज…

अभिनेते सयाजी शिंदे:मालवणातील युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स संस्थेने घेतली सयाजी शिंदेंची भेट..

⚡मालवण ता.०४-:
सिंधुदुर्गला भरपूर वन संपत्ती लाभली आहे. वृक्ष संवर्धनासाठी आपण कार्यरत असून विविध वृक्षांच्या बिया संकलित करून त्यावर संशोधन करून बियांपासून नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, सिंधुदुर्गातील वन संपत्ती व दुर्मिळ झाडे वाचविण्याची आज मोठी गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी व वृक्ष संवर्धक श्री. सयाजी शिंदे यांनी मालवण मधील पर्यावरणप्रेमींशी बोलताना व्यक्त केले.

मालवणात सिनेमा चित्रीकरणाच्या निमित्ताने आलेले ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांची मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स या पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या संस्थांच्या सदस्यांनी तारकर्ली येथे भेट घेतली. देवबाग येथील निलेश सामंत यांच्या माध्यमातून ही भेट संपन्न झाली. यावेळी संस्था अध्यक्षा मेगल डिसोजा व सहकाऱ्यांनी संस्थांकडून पर्यावरण संवर्धन विषयक केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती सयाजी शिंदे यांच्या समोर मांडली. यावेळी कोकणातील पर्यावरण व दुर्मिळ वृक्ष संवर्धनाविषयी उत्तमप्रकारे चर्चा झाली.

यावेळी मेगल डिसोजा, चारुशीला देऊलकर, स्वाती पारकर, कमल बांदकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वप्निल गोसावी, ऍड. ऐश्वर्य मांजरेकर, संजय परुळेकर, भूषण मेतर, तेजस कातवणकर, राहुल जाधव, निलेश सामंत, श्लोक सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी सयाजी शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेसोबत पर्यावरण संवर्धन विषयक कार्य करण्याचा तसेच निवती येथील डुंगुबाच्या राईमध्ये असलेल्या सुंदरी या दुर्मिळ झाडाची पाहणी संस्थेच्या सदस्यांसोबत करण्याचा मानस यावेळी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी स्वप्निल गोसावी यांनी आचरा कांदळवनात असलेल्या इरापू या दुर्मिळ वनस्पतीचीही माहिती शिंदे यांना दिली. सिंधुदुर्गातील वृक्षांच्या बिया संकलित करून देण्याचे आवाहन यावेळी सयाजी शिंदे यांनी उपस्थित सदस्यांना केले.

You cannot copy content of this page