पोयरे मशवीवाडीवर पोलिसांचा धडाकेबाज छापा…

२ लाख ७ हजार ३६० रुपयांचा गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा जप्त..

देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील पोयरे मशवीवाडी येथे आचरा पोलिसांनी टाकलेल्या धाडसी छाप्यात सुमारे २ लाख ७ हजार ३६० रुपये किंमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तेथील संशयित योगेश विलास मयेकर याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोयरे मशवीवाडी येथे अवैध दारुविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दिलीप मांडवकर यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत, चिरेबंदी गडग्यानजीक, बिगरपरवाना चोरटा दारुधंदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवून ठेवलेला आढळून आला.
दरम्यान, संशयित योगेश मयेकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकी स्कूटी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत “सदरची दारू माझीच आहे, काय ते करा” असे म्हणत तेथून निघून जात असताना त्याच्या स्कूटीसमोर पुठ्याचे दोन ब्लॅक दारूचे बॉक्स पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण सुमारे २ लाख ७ हजार ३६० रुपये किंमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला. यात सुमारे १ लाख २० हजार ९६० रुपये किंमतीचे ६३ पुठ्याचे दारूचे बॉक्स, सुमारे ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे १० पुठ्याचे दारूचे बॉक्स, १४ हजार ४०० रुपये किंमतीचे २ पुठ्याचे दारूचे बॉक्स, तसेच ९ हजार ६०० रुपये किंमतीचे २ पुठ्याचे दारूचे बॉक्स यांचा समावेश आहे.
ही कारवाई आचरा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिलिंद परब, कॉन्स्टेबल डिसोजा व कॉन्स्टेबल वैजल यांनी केली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास देवगड पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page