घारपी जिल्हा परिषद शाळेचा ७० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०३-: सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या घारपी गावाचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सत्तरावा वर्धापनदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
१ मार्च १९५६ रोजी स्थापन झालेल्या या शाळेने शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत सात दशकांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला.
वर्धापनदिनानिमित्त आजी -माजी विद्यार्थी,शिक्षक ,पालक व ग्रामस्थ, अबालवृद्ध अख्खे गाव एकत्र आले होते. त्यामुळे रविवारी सुट्टीचा दिवस असूनही शाळा परिसर फुलून गेला होता.नोकरी निमित्ताने बाहेर गावी असलेले माजी विद्यार्थीही स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित होते
ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत माजी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आकर्षक रांगोळ्या,पाना- फुलांचे तोरण व फुगे यांनी शाळा परिसर सुशोभित करण्यात आला होता.
यादिवशी शाळेच्या ७० वर्षांच्या कार्याचा गौरव म्हणून ७० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्या प्रकाशात शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा आणि ज्ञानदीपाचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येक मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांचे झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. ही रोपे शाळा परिसरात लावण्यात आली.त्यामुळे वर्धापनदिनाचा एकत्रित सोहळा केवळ आठवणींचा नव्हे तर भविष्यासाठी हरित संकल्प करणारा ठरला.माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी जपण्यासाठी एकत्रित फ्लेक्सबोर्डवर सही घेण्यात आली.
सत्तर वर्षांचा हा प्रवास केवळ एका शाळेचा नसून, घारपी गावाच्या प्रगतीचा आणि शैक्षणिक उन्नतीचा साक्षीदार आहे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.यावेळी शाळा परिसरात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नव्याने दुरुस्ती झालेल्या इमारतीचे फित कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र देऊन रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.शाळेच्या माजी विद्यार्थी यांचाही दहावी परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला.शाळेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचेही ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेत आयोजन करण्यात आले होते.
घारपी शाळेचा हा सत्तरावा वर्धापनदिन गावकऱ्यांच्या एकजुटीचा, कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा अविस्मरणीय सोहळा ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, स्वाती गावडे,दिपक गावडे,विजय गावकर,जानकी गावडे , हरिभाऊ गावडे, मधुकर गावडे,मुख्याध्यापक श्री जे‌.डी.पाटील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे ,धर्मराज खंडागळे अंगणवाडी सेविकांना संजना गावकर,मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, पोलीस पाटील समृद्धी गावडे ,आशा सेविका उत्तरा नाईक यांच्या सह सर्व आजी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page