देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील आरसीसी गटार कामातील अनियमिततेवर कारवाईची मागणी…

नगरसेवक श्री. सुधीर लवू तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; अंतिम स्मरणपत्रासह उपोषणाचा इशारा..

⚡देवगड ता.०३-:
देवगड-जामसंडे नगरपंचायती हद्दीतील भटवाडी रस्ता (आदर्श शाळा ते ओझर) येथील बंदिस्त आरसीसी गटार बांधकामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित कामावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा अंतिम स्मरणपत्र देऊन उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेवक श्री. सुधीर लवू तांबे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

या संदर्भात त्यांनी यापूर्वी जावक क्र. 30/2025-26 दिनांक 16/01/2026 व जावक क्र. 31/2025-26 दिनांक 05/02/2026 रोजी निवेदन सादर केले होते. तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीकडून जावक क्र. 6755/2026 दिनांक 17/02/2026 रोजी उत्तर प्राप्त झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर गटार बांधकामासाठी रुपये 14,99,169/-, रुपये 19,68,885/- तसेच रुपये 9,61,120/- अशा विविध निधींमधून मंजुरी देण्यात आल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणी, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व उपलब्ध छायाचित्रांनुसार पुढील गंभीर अनियमितता निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.

इस्टीमेट व तांत्रिक मंजुरीनुसार गटराची उंची सुमारे 0.60 मीटर (अंदाजे 2 फूट) अपेक्षित असताना प्रत्यक्षात गटाराची उंची केवळ सुमारे 7 ते 8 इंच इतकीच असल्याचे आढळते.

गटार खोदाईनंतर soling व P.C.C. न करता थेट स्टील बांधून काँक्रीट टाकून काम करण्यात आले आहे. गटाराचे बांधकाम दर्जाहीन असून काँक्रीटची जाडी, मजबुती व तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही.काम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदारास देयके अदा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यामुळे शासन निधीचा अपव्यय झाल्याचा संशय आहे. एकाच कामासाठी विविध निधीतून वारंवार मंजुरी देण्यात आल्यामुळे आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेची चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संदर्भ क्र ३ अन्वये प्राप्त झालेल्या उत्तरात प्रत्यक्ष वस्तुस्थिती, तांत्रिक त्रुटी व स्थळ पाहणीतील निष्कर्ष यांच्याशी पूर्ण विसंगती असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page