नेहमी केंद्र सरकार व भाजपवर टिका करु नये;दोडामार्ग भाजप अध्यक्ष प्रवीण गवस
💫 *दोडामार्ग दि.२१-:* प्रत्येक वेळी केंद्र सरकार व भाजपा नेत्यांवर टिका करणाऱ्या पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी कोविड काळातील जिल्हा प्रशासनाची डोलती नौका संभाळावी. असा टोला भाजप दोडामार्ग तालुका अध्यक्ष प्रवीण गवस यांनी लगावला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून वारंवार कोविड केअर सेंटरच्या (सी.सी.सी.) नावाने वाटण्यात येणारी खिरापत बंद करुन डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डी.सी.एच.सी.) सुरु करण्यावर भर दिला असता तर आज बऱ्याचशा जिल्हावासियांचे प्राण वाचवू शकलो असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहीलेले आमदार दिपक केसरकर सुध्दा प्रशासन आपल्या अनुभवाचा वापर करत नसलेबाबत उघडपणे बोलत आहेत. जिल्हा प्रशासन हे महाराष्ट्रशासन अंतर्गत येते याची कल्पना आमदार वैभव नाईक यांना आहे. मात्र स्वत: सरकारमधील आमदार असल्याने आणि आपल्याच यंत्रणेविरुध्द बोलता येत नसल्याने वैफल्यग्रस्त होवून आमदार वैभव नाईक केंद्र सरकारवर टिका करीत आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाता करणारे सत्ताधारी खासदार,आमदार काही करता येत नसल्याने केवळ केंद्र सरकार व राणे कुटुंबियावर टिका करुन प्रसिद्धीचा खटाटोप करत आहेत. आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे आले अंगावर ढकलले केंद्र सरकारवर अशा अविर्भावात सत्ताधारी वावरत आहेत. लॉकडाउन नंतर विविध प्रकारच्या मदतीची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारची मदत सर्वसामान्यांपर्यंत अद्यापही पोहचली नाही. धान्य वितरण व्यवस्थित होत नसल्याने धान्य दुकानांचा ताबा शिवसेना घेईल अशा बातम्या शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुखांना द्याव्या लागत आहेत. यावरून सत्ताधारी म्हणून आपली प्रशासनावर किती पकड आहे, याचा अभ्यास आमदार वैभव नाईक यांनी करण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्हा संभाळा मग केंद्राकडे लक्ष द्या. असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्तृत्व व कामाची गती यांवर बोलण्यापेक्षा सुस्त प्रशासनासोबत काम करून आमदार दिपक केसरकर यांचे शिवसेनेतील वजन कमी करण्याच्या आपल्या कार्यावर आमदार वैभव नाईक यांनी भर द्यावा असा टोला दोडामार्ग तालुका भाजपा अध्यक्ष प्रवीण गवस यांनी लगावला आहे.
