निवती दौऱ्यात असतानाही मुख्यमंत्री आले नाहीत

मच्छिमार, बाधितांचा भ्रमनिरास बाळू देसाई यांचा आरोप

*💫वेंगुर्ले दि.२१-:* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय दौऱ्यात वेंगुर्ले तालुक्यातील निवती किनारपट्टीला भेटीचा नियोजित कार्यक्रम असुनही चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरुन त्यांनी थेट मालवण गाठले. त्यामुळे वेंगुर्ले वासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री वेंगुर्ले तालुक्यातील निवती भागात येणार म्हणून मच्छिमार बांधव उत्सुकतेने वाट पाहत होते. कारण मुख्यमंत्री आले तर नुकसानीची पहाणी करतील व भरघोस अशी नुकसान भरपाई मंजूर करतील अशी अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी अर्ध्यावरच दौरा आटपल्यामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान पुन्हा एकदा माजी पालकमंत्री दिपक केसरकर कमी पडले व आमदार वैभव नाईक वरचढ ठरले असल्याचे दिसून आल्याची खरमरीत टीका भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी केली आहे. *मुख्यमंत्र्यांच्या तीन तासांच्या दौरयाचे फलीत काय ?* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तीन तासांचा सिंधुदुर्ग दौरा केला. परंतु गेले दोन दिवस सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली, अधिकारी दौरा नियोजनात अडकले त्यामुळे नुकसानग्रस्तांचे पंचनामे होऊ शकले नाहीत. तसेच मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात नुकसान भरपाई बाबत कोणतीही घोषणा न केल्यामुळे सिंधुदुर्ग वासीयांच्या तोंडाला पाने पुसल्या सारखे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नुकसान ग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी आले होते का, अशी चर्चा नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमार करत आहेत असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page