⚡आंबोली ता.२६-: आंबोली फौजदारवाडी येथील गणेश कोंड परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका सांबर हरणाच्या पिल्लावर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच आंबोली वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
पिल्लू पाण्यात अडकलेल्या अवस्थेत असल्याने जलद कृती दलातील सदस्य प्रथमेश गावडे व दीपक नाटलेकर यांनी तत्परता दाखवत पाण्यात उतरून मोठ्या शिताफीने त्या पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर जखमी अवस्थेतील हरणाच्या पिल्लाला आंबोली फॉरेस्ट ऑफिस येथे आणून तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचारानंतर पिल्लाची प्रकृती स्थिर झाल्याने त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेत आंबोलीचे वनरक्षक अनिकेत आवारे, वनसेवक मंगेश सावंत, एकनाथ पारधी, वसंत गावडे तसेच जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, श्रीकृष्ण गवस, आत्माराम मोहिते व निलेश गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वनविभागाच्या तत्परतेमुळे जखमी पिल्लाचे प्राण वाचल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी सांबर पिल्लाचे वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू…
