गुरुदास गवंडे:कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील..
⚡बांदा ता.२६- निगुडे येथील माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशन–सोनुर्ली–निगुडे–बांदा व परतीच्या मार्गावर एसटी फेऱ्या सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत २८ फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.
गवंडे यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रा.प.म.) कणकवली विभागाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देत एकूण ११ फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विभाग नियंत्रक, कणकवली यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी पत्र देत २७ फेब्रुवारीपासून काही फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर विस्तारित करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
पत्रानुसार सावंतवाडी–सोनुर्ली–विस्तारित बांदा सकाळी ९.०० वा. व परतीची फेरी ९.५५ वा., दुपारी २.०० वा. व परतीची २.५५ वा., तसेच संध्याकाळी ५.०० वा. व परतीची ५.५५ वा. अशा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, मागणीप्रमाणे उर्वरित फेऱ्यांबाबत तिकीट दरवाढीचा उल्लेख करण्यात आल्याने गवंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वी सावंतवाडी बस स्थानक–सोनुर्ली–निगुडे तिठा या मार्गावर अपुऱ्या स्वरूपात बस सुरू करून ‘धुळफेक’ केल्याचा आरोप त्यांनी एसटी प्रशासनावर केला आहे. त्यामुळे सर्व मागण्या पूर्ण होऊन फेऱ्या कायमस्वरूपी सुरू करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सावंतवाडी आगार व्यवस्थापक कार्यालयासमोर गवंडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपोषणास बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एसटी प्रशासनाने या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
