संत साहित्य जीवनमार्ग हे दर्शविणारे…

अ‍ॅड. देवदत्त परुळेकर; ‘कै. प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार’ प्रदान..

⚡बांदा ता.२३-: “संत साहित्य हे केवळ अध्यात्म नाही, तर ते जीवन जगण्याचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ माणसाला अंतर्मुख करतो आणि समाजाशी जोडून ठेवतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. देवदत्त परुळेकर यांनी येथे केले. श्री परुळेकर यांना यंदाचा नट वाचनालयचा मानाचा ‘कै. प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध साहित्यिक कै. नेरुरकर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचनालयातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कै. नेरुरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष निलेश मोरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव राकेश केसरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. अ‍ॅड. परुळेकर यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपल्या भाषणात अ‍ॅड. परुळेकर यांनी संत साहित्यावरील अभ्यासपूर्ण विचार मांडले. ज्ञानेश्वरीवरील भाष्य करताना त्यांनी वै. मामा दांडेकर दिंडी तसेच आषाढी वारीतील अनुभव कथन करून उपस्थितांना भावुक केले.
या कार्यक्रमात नवनियुक्त जि. प. सदस्य प्रमोद कामत आणि पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कै. नेरुरकर यांचे विद्यार्थी अन्वर खान, डॉ. रुपेश पाटकर, प्रमोद कामत आणि डॉ. ज्योती बुवा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, जि. प. सदस्य प्रमोद कामत, पं. स. सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच संचालिका सौ. स्वप्निता सावंत उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाला प्रकाश नेरुरकर, किरण पिंगुळकर, अ‍ॅड. पी. डी. देसाई, गुरुदत्त नेरुरकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, सौ. मंगला परुळेकर यांच्यासह वाचनालयाचे सदस्य, वाचक, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव राकेश केसरकर यांनी केले.

You cannot copy content of this page