पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्यावेळीच मच्छिमारांना जास्त नोटीसा आल्या…

हरी खोबरेकर :नोटिसांचा जाच न थांबल्यास महसूल विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा…

⚡मालवण ता.२०-:
आम. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून किनारपट्टीवर ३५२ नोटिसांचा जो पाढा वाचला जात आहे, त्यातील बहुतांश नोटिसा या २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्याच्या वेळी काढण्यात आल्या होत्या. त्या नोटिसा कुणामुळे आल्या? त्यावेळी शासन कोणाचे होते ? त्यावेळी मच्छीमारांच्या झोपड्या आणि राहती घरे तोडताना राणे व सामंत गप्प का होते? आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही मच्छीमारांच्या नुकसानीकडे डोळेझाक केली का? असे प्रश्न ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करत मच्छीमारांच्या घरांवर नांगर फिरवणाऱ्यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या सत्तेचा वापर करून ही घरे कशी वाचवणार हे सांगावे, असे आव्हान देतानाच जर महसूल विभागाने या नोटिसांचा जाच थांबवला नाही, तर लवकरच ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तहसील आणि प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खोबरेकर यांनी दिला.

मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, नितीन वाळके, महेश जावकर, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, नगरसेविका अनिता गिरकर, हेमंत मोंडकर, बंडू सरमळकर, चिंतामणी मयेकर, चंदू खोबरेकर, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर, सुरेश मडये, पॉली गिरकर आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत बोलताना हरी खोबरेकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करणाऱ्या निलेश राणे आणि दत्ता सामंत यांना जोरदार प्रत्युत्तर देत मच्छिमारांना आताच नोटीसा कशा आल्या ? हा वैभव नाईक यांचा प्रश्न रास्त असल्याचा दावा केला. यावेळी खोबरेकर म्हणाले, शासनाने एकीकडे कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र हे सर्वेक्षण पूर्ण होण्याआधीच मच्छीमारांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन नोटिसा बजावल्या जात आहेत. वर्षानुवर्षे किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या आणि जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या मच्छीमारांनी कोणता गुन्हा केला आहे?” असा प्रश्न करत हा सरकारचा मच्छीमारांना विस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप खोबरेकर यांनी केला. तसेच आम. राणे यांच बंधू पालकमंत्री आहेत, वडील खासदार आहेत, मग मच्छीमारांच्या नोटिसा रद्द का करत नाही? असा सवाल खोबरेकर यांनी केला.

तसेच शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या टीकेला उत्तर देताना खोबरेकर म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीतून तुम्ही ठेकेदारी केली. देवबाग आणि तोंडवळी येथे बंधाऱ्यासाठी जो दगड जात आहे, तो नाईक यांनी आणलेल्या निधीतूनच आहे. एकीकडे त्यांच्या निधीतून आपली घरे भरता आणि दुसरीकडे त्यांच्यावरच टीका करता, ही दुटप्पी भूमिका जनता ओळखून आहे. देवबागमध्ये मंजूर झालेल्या १ कोटीच्या बंधाऱ्याचे काम का झाले नाही? त्याचे पैसे कोणी जिरवले, याचे उत्तर देवबागवासीयांना द्या, असे आव्हानही श्री. खोबरेकर यांनी दिले आहे.

मच्छीमारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या जिल्ह्याला वैभव मिळवून देणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असा निर्धार श्री. खोबरेकर यांनी व्यक्त केला. तसेच किनारपट्टीवरील ज्या मच्छिमार बांधवांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. त्यांना मार्गदर्शन तसेच कायदेशीर उत्तर देण्यासाठी सीआरझेडची तज्ञ व्यक्ती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी ठाकरे शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शहरप्रमुख बाबी जोगी यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page