कुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉ.अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते…

कुडाळ : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई संचलित शंकर महादेव विद्यालय व कुंभवडे गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे पार पडल्या. या स्पर्धेत विविध गटात डॉ.अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या यांनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन कुंभवडे ग्रामस्थ संघाचे उपाध्यक्ष व उद्योजक गणेश महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ संघाचे सचिव विजय सावंत, फ्रान्सिस डिसोझा, आबा बांदेकर, सातवसे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा सावंत आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे योगेश फणसळकर, अनिल कम्मार, पांडुरंग पाताडे, सचिन घाडी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचा शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये खुल्या गटांमध्ये ६४, अठरा वर्षाखालील मुले व अठरा वर्षाखालील मुली या वयोगटांमध्ये प्रत्येकी १६ तर मुलींच्या गटांमध्ये प्रत्येकी आठ असे खेळाडू सहभागी झाले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात देवगडच्या मिहीर कार्लेकरने कुंभवड्याच्या देवांग मयेकरवर विजय मिळवला तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात कणकवलीच्या दिव्या राणेने कणकवलीच्या जान्हवी सोनारवर मात केली. अठरा वर्षाखालील मुला मुलींच्या गटांमध्ये खरी चुरस होती. मुलींमध्ये सावंतवाडीच्या साक्षी रामदूरकरने कणकवलीच्या दिव्या राणेवर विजय मिळवत मागील पराभवाची परतफेड केली, परंतु अठरा वर्षाखालील मुलांच्या गटात सावंतवाडीच्या तेरा वर्षीय भरत सावंतने सावंतवाडीच्याच माजी विजेत्या अमूल्य गाडीला कडवी झुंज दिली. पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले तिसऱ्या सेटमध्ये अमूल्यने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
खुल्या गटामध्ये पहिल्या फेरीपासूनच चुरशीचे सामने झाले व अनेक अनपेक्षित निकाल समोर आले उपउपांत्य फेरीमध्ये प्रशांत म्हात्रे, सचिन घाडी, गौतम यादव, सागर ढवळ यांसारख्या माजी जिल्हा विजेत्यांना पराभवाचा धक्का बसला. पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये जूनियर गटामधून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या कनेडीच्या दीक्षा चव्हाणने मागील दोन जिल्हा स्पर्धा सलग जिंकलेल्या सावंतवाडीच्या अर्पित बांदेकरवर रोमहर्षक विजय मिळवला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये आपल्या उल्लेखनीय सरावाच्या जोरावर कौशल्यपूर्ण खेळ करणाऱ्या कणकवलीच्या डॉक्टर अनिल तायशेटे यांनी सावंतवाडीच्या ज्युनियर विजेत्या अमूल्य घाडीवर मात केली.
अंतिम सामन्यांमध्ये सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोचली होती. खुल्या गटामध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या दिक्षा चव्हाणने अनिल तायशेटे यांना कडवी झुंज दिली. पहिला सेट आठ बोर्ड नंतर १९ – १९ असा बरोबरी झाल्यांवर निर्णायक बोर्ड मध्ये अनिल यांनी टॉस जिंकला व ब्रेकचा फायदा आपल्या पदरात पाडून घेतला. परंतु जिगरबाज दिक्षाने शेवटच्या सोंगटीपर्यंत झुंज दिली. शेवटी विजयाचे दान अनिल तायशेटे यांच्याच बाजूने पडले. दुसऱ्या सेटमध्ये दिक्षाच्या खेळामध्ये विजयाचा दृढनिश्चय दिसत होता. सहा बोर्ड नंतर तिने २२ – ०९ अशी मोठी आघाडी घेतली होती. परंतु डॉक्टरनी पुन्हा एकदा स्वतःच्या ब्रेक मध्ये कॅरमवर वर्चस्व प्रस्थापित करत ब्रेक टू फिनिश केला व स्कोर २२ – २१ वर पोहोचवला शेवट आठवा बोर्ड चार गुणांनी जिंकत डॉक्टर अनिल तायशेटे यांनी या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

You cannot copy content of this page