श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा…

⚡बांदा ता.१२-: बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी असून पूर्वसंध्येला शनिवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल.

यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. शनिवार दि १४ फेब्रुवारी रोजी रात्रो ९ ते १२ श्री बांदेश्वर मंदिराभोवती श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक होईल. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण होईल.सायं ३.३० ते ८.३० या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ९ ते १२ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल.

सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायं ४.३० वाजता श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील . श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणाकरून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती करण्यात येईल. रात्रौ ९ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका लोककला दशावतार नाट्यमंडळ मळगांव सावंतवाडी यांचा नाट्यप्रयोग सादर होईल.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती व प्रमुख मर्याददार बांदा,यांच्यावतीने करण्यात आले आहे.

फोटो –
( बांदा येथील श्री देव बांदेश्वर मंदिर )

You cannot copy content of this page