कदम परिवाराचा दातृत्वाचा वारसा कौतुकास्पद..
⚡देवगड ता.११-: समाजहित आणि दातृत्वाचा वारसा जपत, इळये गावचे दानशूर ग्रामस्थ श्री. रमाकांत अर्जुन कदम यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. सौ. सत्यभामा अर्जुन कदम यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) इळयेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
प्रवेशद्वाराचे उद्घाटन इळये गावचे सरपंच श्री. रविंद्र वा. ठुकरूल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच श्री. गुरुनाथ राणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहूल जाधव, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य श्री. भाऊ कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. भाई कदम आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. उज्वल झरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान इळये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळालेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला.
या केंद्रासाठी शिक्षण महर्षी माजी आमदार कै. राजाभाऊ मिराशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एक एकर जमीन विनामोबदला देऊन आरोग्याच्या सेवेचा पाया रचला होता.
तोच दातृत्वाचा वारसा पुढे नेत श्री. रमाकांत कदम यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य प्रवेशद्वार उभारून केंद्राच्या सौंदर्यात आणि सुविधेत भर घातली आहे.
या सामाजिक बांधिलकीबद्दल दानशूर ग्रामस्थ श्री. रमाकांत कदम साहेब आणि त्यांच्या सहचारिणी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी कदम परिवाराच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले.
या सोहळ्याला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. आरोग्य केंद्राच्या या नव्या सुशोभीकरणामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
