⚡दोडामार्ग ता.०९-: तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन करत तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मतदारांनी विकास, स्थैर्य आणि विश्वासाला कौल देत महायुतीच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमताने विजयी केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत मणेरी मतदारसंघातून महायुतीच्या साक्षी तळवडेकर यांनी दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तसेच साटेली–भेडशी मतदारसंघातून श्वेता धर्णे यांनी विजयश्री खेचून आणली. माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे रामा उर्फ दीपक गवस यांनी विजय मिळवत महायुतीच्या यशात भर घातली.
पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले. कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेच्या सायली निंबाळकर यांनी विजय मिळवला. मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या सोनिया अंकुश (भैया) नाईक / कुबल विजयी झाल्या. माटणे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या पार्वती गवस, साटेली–भेडशी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे संजय सातार्डेकर तसेच झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेच्या स्नेहा गवस यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस हे बिनविरोध निवडून आले.
या निकालामुळे दोडामार्ग तालुक्यात महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तालुकाभर विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
