२३ एसटी बसेस आणि २८ इतर वाहनांचा वापर..
⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यातील ९ जि.प. व १८ पंचायत समितीच्या जागासाठी उद्या ७ फेब्रुवारी रोजी मनदान होत असून आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान मशीन व साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, नायब तहसिलदार संजय गवस गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या १८ मिळून २७ जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन आणि इतर साहित्य घेऊन २३ बसेस आणि २८ इतर वाहनातून कर्मचारी आज सकाळी रवाना झाले. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी श्रीफळ वाढवून या बसेस आणि कर्मचाऱ्यांना मार्गस्थ केले.
मतदान प्रक्रियेसाठी एकूण ८५० निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये: २४ क्षेत्रीय अधिकारी, १५३ केंद्राध्यक्ष, ४६० मतदान अधिकारी
प्रत्येक केंद्रावर शिपाई व व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ३५० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले असून दोन जलद कृती पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी २२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ४५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अशा प्रकारे एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील एकूण १,१६,६३० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये ५८,०९९ महिला आणि ५८,५३१ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
