Headlines

कळसुलीतील भोगनाथवाडी – बौद्धवाडी – कावळेटेंबवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा…

⚡कळसुली ता.०३-: कळसुली गावातील भोगनाथ मंदिर ते किशोर गावकर यांच्या घरापर्यंत सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. भोगनाथवाडी, बौद्धवाडी आणि कावळेटेंबवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या एक ते दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या कालावधीत केवळ आश्वासनांपलीकडे काहीच घडले नसून सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, खराब पृष्ठभाग यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे. दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने चालवताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अनेक अपघातही या मार्गावर झाले आहेत.

हा रस्ता शिवडाव, दारिस्ते व नाटळकडे जाणारा मुख्य व मध्यवर्ती मार्ग असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर भोगनाथवाडी, बौद्धवाडी व कावळेटेंबवाडीतील ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

You cannot copy content of this page