नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: त्वरित बंदोबस्त करा, नागरिकांकडून होत आहे मागणी..
⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील सर्वोदयनगर परिसरात पहाटेच्या सुमारास गव्या रेड्यांचा मोठा कळप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत गव्या रेड्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोदयनगर परिसरात आज पहाटे गव्या रेड्यांचा कळप दिसून आला. यापूर्वी जंगल परिसरात दिसणारे हे गवे आता थेट नागरी वस्तीमध्ये येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सकाळच्या वेळेत अनेक नागरिक या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून गव्या रेड्यांचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी ठाम मागणी सर्वोदयनगर परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
