वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच होणार सुरू…

पालकमंत्री नितेश राणे:राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याचा मोठा फायदा कोकणच्या विकासाला होत आहे..

⚡कणकवली, ता. ०२-:
वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली असून उर्वरित निधीची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली.

सन २०२८ पर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण होऊन प्रत्यक्ष रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याचा मोठा फायदा कोकणच्या विकासाला होत आहे. वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्ग गेली अनेक वर्षे रखडलेला होता. मात्र केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. उर्वरित निधीची तरतूद आता राज्याच्या अर्थसंकल्पात केली जाईल.
या रेल्वे मार्गामुळे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडली जाणार असून रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. अनेक नवीन उद्योग येथे स्थापन होणार आहेत. भविष्यात हा रेल्वे मार्ग बंदरांशीही जोडला जाणार असल्याने किनारपट्टी संपूर्ण देशाशी रेल्वेमार्गे जोडली जाईल. त्यामुळे कोकणच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर तसेच नवीन उद्योग-व्यवसाय उभे राहिल्यानंतर मुंबई, पुणे, गोवा येथे रोजगारासाठी गेलेले तरुण पुन्हा सिंधुदुर्गात परततील, असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page