पहाटेची घटना:लाखोंचे नुकसान..
⚡मालवण ता.०२-:
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा वेग आणि तीव्रता अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला आणि काही वेळातच संपूर्ण इमारत जळून भस्मसात झाली.
सुदैवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही
