महेश सारंग यांचा पलटवार: मी जर धमक्या वगैरे देत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला माझी तक्रार करावी,.
⚡सावंतवाडी ता.०२-:
आज मायकल डिसोजा यांना शिंदे शिवसेनेसह अपक्षांची ताकद घ्यावी लागत आहे, यावरूनच या मतदारसंघातील भाजपची खरी ताकद किती आहे हे स्पष्ट होते, असा पलटवार भाजपचे उमेदवार महेश सारंग यांनी आज येथे केला. त्यांच्या मागे आज नेमकी कोणाची ताकद आहे हे मला माहिती नाही; मात्र कितीही दावे केले तरी ९ तारखेला गुलाल हा माझाच असणार, असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला.
सारंग म्हणाले की, भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून जनता या विकासाच्या कामांच्या पाठीशी उभी राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात येत आहेत, ते सिद्ध करून दाखवावेत; अन्यथा त्यांनी थेट पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दाखल करावी. जर मी जिल्हा बँक किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गैरवापर करत असेन, तर त्याची चौकशी व्हावी, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, मला धनशक्तीचा वापर करण्याची गरज नाही. आम्ही केलेली विकासकामे हाच आमच्या विजयाचा खरा आधार आहे. तसेच, आज जे जे पक्ष त्यांनी बदलले, ते ते पक्ष संपुष्टात आले, असा टोला लगावत आमच्या घरात किती पदे आहेत, हे जाहीर करावे; उगाच बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही सारंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
