विजय केनवडेकर:उद्योजकतेला बळ मिळून रोजगारनिर्मितीला गती मिळेल..
⚡मालवण ता.०१-:
केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प तरुणांना प्रोत्साहन देणारा असून, मागील चार अर्थसंकल्पांतील धोरणांची सुसंगत पुढची पायरी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते मागील अर्थसंकल्पांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याचाच विस्तार करत या अर्थसंकल्पात शाश्वत विकासावर विशेष भर देण्यात आल्याने तरुणांना संधी देणारा आणि शाश्वत विकासाला दिशा देणारा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाचे राष्ट्रीय सदस्य श्री.विजय केनवडेकर यांनी व्यक्त केला.
श्री केनवडेकर म्हणाले, उद्योगांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण संस्थांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २२ ते ३५ वयोगटातील तरुण, जे शिक्षण घेत असतानाच नवीन कल्पनांवर काम करतात व नव्या संकल्पना विकसित करतात, अशा तरुणांना प्रोत्साहन व सहाय्य देण्याची ठोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे उद्योजकतेला बळ मिळून रोजगारनिर्मितीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले उद्योगातील उत्पादनाचा दर्जा वाढवून भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. औषधनिर्मिती तसेच त्यावरील संशोधनासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
तसेच गारमेंट व फुटवेअर उद्योगातील उत्पादन वाढवण्यासाठी करसवलती देण्यात आल्या असून, निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला आहे. कौशल्याधारित कामगारांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणारा हा अर्थसंकल्प असून, भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी तो निश्चितच दिशादर्शक ठरेल असेही ते म्हणाले
