⚡मालवण,ता.०१-:
मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित वस्त्रहरणकार स्व. गंगाराम गवाणकर स्मृती वाचक स्पर्धेत विविध गटात सोहम गवाणकर, संस्कृती नाईक, वेदांत नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
वाचन संस्कृती जपली जावी आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल व ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयात ‘वस्त्रहरणकार स्व. गंगाराम गवाणकर स्मृती’ वाचक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. शालेय ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सलग पाचव्या वर्षी यशस्वीरित्या संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक व पर्यवेक्षक देविदास वेरलकर होते. त्यांनी सोशल मीडियाच्या काळात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे आवाहन केले. शालेय ग्रंथपाल सुमित मसुरकर यांनी प्रास्ताविकात मालवणी भाषेला जागतिक ओळख मिळवून देणारे सुपुत्र स्व. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीला यंदाची स्पर्धा समर्पित करण्यात आली आहे असे सांगितले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा- अनुक्रमे गट १ (५ वी ते ७ वी) ओजस्वी कैलास साळुंखे, विभा युगलकुमार प्रभूगावकर, सोहम योगेंद्र धामापूरकर, गट २ (८ वी ते १० वी) अस्मी अशोक आठलेकर, पार्थ प्रदीप सामंत, ऋचा रामचंद्र चव्हाण, गट ३ (११ वी व १२ वी) सुधीर संदीप पारस, रिया नितीन मयेकर, कोसेसाव जुवाव फर्नांडिस.
माजी विद्यार्थी दर्श सामंत यांनी स्व. गंगाराम गवाणकर यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट सादर करून त्यांच्या साहित्यिक योगदानाची ओळख करून दिली. परीक्षक म्हणून संजय जोशी, सुभाष प्रभूखानोलकर, श्रुती बांदेकर, सायली साटलकर, मानसी धामापूरकर, प्रसाद तोंडवळकर यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता रावराणे यांनी केले. महेश धामापूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
