रविंद्र माणगावे:राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडवणार,३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न..
⚡देवगड ता.३१-:
महाराष्ट्रात यापूर्वी हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. आता शैक्षणिक क्रांतीनंतर ग्राम उद्योग क्रांतीची सुरुवात झाली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘गाव तिथे उद्योजक’ घडविण्याचा संकल्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. या संकल्पानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते चार वर्षांत ३६ हजार उद्योजक तयार झालेले दिसतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी देवगड येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यात केले.
देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा देवगड येथील शेठ. म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व अॅप्लॉईड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमन रामभाऊ भोगले, आय-४१ इन्व्हेसमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक महेश चव्हाण, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, उपाध्यक्ष संजय भोगटे, सागर शिरसाट, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सचिव संजय मेस्त्री, देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे तसेच इतर तालुक्यातील व्यापारी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटनपर मनोगतात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी ‘गाव तिथे उद्योजक’ ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची संकल्पना असून, या संकल्पनेची मुहूर्तमेढ या मेळाव्यात रोवण्यात आल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांनी काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन व्यापाराच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑनलाईन विक्री व बल्क खरेदी यांसारखे पर्याय स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावात उद्योग निर्माण करण्यासाठी चेंबर सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांनी मूल्याधिष्ठित व्यापार दीर्घकाळ टिकतो, असे नमूद केले. युवकांची बदलती विचारसरणी लक्षात घेऊन जुन्या पिढीने नवीन तंत्रज्ञान व पद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक व्यापाऱ्यांनी आधुनिकीकरण केल्यास मोठ्या कंपन्यांशीही सक्षम स्पर्धा करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योजक अविनाश पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉजिस्टिक, पर्यटनपूरक व पर्यावरणपूरक उद्योगांसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. व्यापारी महासंघासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उभारण्याची गरज व्यक्त करत शासनाकडून जागा उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी व्यापार क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग अधोरेखित केला. महिला उद्योजक सक्षमपणे पुढे येत असून संघटित प्रयत्नातून व्यापारी क्षेत्र अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना सातत्याने सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सरचिटणीस नितीन वाळके यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा सादर केला. स्वतंत्र सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण समिती स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आर्थिक फसवणूक व खोट्या नोटिसांविरोधात महासंघ सक्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्नसुरक्षा परवाना नूतनीकरणासाठी विशेष मोहीम, प्रशिक्षण कार्यशाळा व त्रिस्तरीय संघटनात्मक रचना लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीसाठी एक कोटी रुपयांचा सहाय्यता निधी उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली.
देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांनी देवगड तालुक्यातील व्यापाऱ्यांचा जिल्हा व्यापारी संघाच्या सदस्यत्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले. देवगड तालुक्यातच व्यापारी पर्यटन संस्थेची प्रथम स्थापना झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा व्यापारी एकता मेळावा देवगड येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला पर्यटनाची जोड देत देवगड पर्यटन समितीच्या वतीने फिश फूड अँड फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन करण्यात आले.
देवगड व्यापारी संघटनेने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून महावितरणशी व्यापाऱ्यांची कनेक्टिव्हिटी निर्माण केल्यामुळे हॉटेल व्यवसाय, कोल्डड्रिंक्स विक्रेते व इतर व्यावसायिकांना त्याचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी ऑनलाईन माध्यमातून जोडले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या यशामध्ये टीमवर्क महत्त्वाचे असल्याचे सांगत, देवगड व्यापारी संघाने याला प्राधान्य दिल्याचे कदम यांनी नमूद केले. तसेच तालुक्यातील १०० वर्षे पूर्ण केलेल्या आस्थापनांचा सन्मान करण्याचा उपक्रम प्रथम देवगडमधूनच सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यापारी महासंघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत महासंघ प्रगतीपथावर असल्याचा अभिमान व्यक्त केला व मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार – श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल
आदर्श व्यापारी व शेतकरी पुरस्कार – प्रसन्न गोगटे
जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ व्यापारी राजाराम कदम
कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार – सौ. सुषमा सदानंद देसाई
कै. भाईसाहेब भोगले स्मृती युवा उद्योजक पुरस्कार – विजय उर्फ बंटी प्रमोद कदम
कै. बापू नाईक स्मृती पर्यटन व सेवा उद्योग पुरस्कार – रानमाणूस प्रसाद गावडे (दोडामार्ग)
उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार – उमेश नेरुरकर (मालवण)
उद्घाटनापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व जिल्ह्यातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुबल व सौ. विद्या माणगावकर यांनी केले.
