⚡बांदा ता.२७-: बांदा शहर विकास आघाडीच्या पंचायत समिती उमेदवार सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बांदा येथील श्री बांदेश्वर भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी त्यांनी देवदर्शन करून प्रचाराला सुरुवात केली.
याप्रसंगी बोलताना ऋतिका नाईक म्हणाल्या की, “माझ्यावर भाजप महायुतीकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा दबाव टाकण्यात आला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता मी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.”
भाजपने दिलेला उमेदवार हा आधीच स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी असून, अशा उमेदवाराला पुन्हा पंचायत समितीसाठी उमेदवारी देऊन नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बांदा शहरातील मतदारांना गृहीत धरून भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“निवडणूक लढवून पुन्हा ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक घ्यायचा घाट भाजपने घातला आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी मतदारांच्या बुद्धिमत्तेचा अपमान केला जात असल्याचे सांगितले. आजचा युवा वर्ग तसेच महिलांचा मोठा पाठिंबा आपल्याला मिळत असून, त्यामुळेच आपल्याला धनशक्तीचे आमिष दाखवण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र बांदा शहरातील जनता योग्य वेळी मतपेटीतून याचे उत्तर देईल, असा विश्वास ऋतिका नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांद्यात ऋतिका नाईक यांचा प्रचाराचा शुभारंभ…
