गांधी विचारांच्या पुनर्विचारासाठी मालवणात गांधी जागर कार्यक्रमाचे आयोजन…

⚡मालवण ता.२२-:
गांधी विचारांचे सखोल आकलन आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर मंथन घडवणारा ‘गांधी जागर २०२६’ हा द्विदिवसीय वैचारिक कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी व रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या गांधी जागरात विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व लेखक सहभागी होणार असून त्यांच्या व्याख्यानातून गांधीजींच्या विचारांचा आजच्या काळातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संदर्भात पुनर्विचार केला जाणार आहे, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खंडाळेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, कार्योपाध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, कमलताई परुळेकर, सौ. ज्योती तोरसकर आदी उपस्थित होते.

यावेळी ऍड. परुळेकर म्हणाले, गांधी जागर या कार्यक्रमात साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर (बांदा) हे ‘गांधी विचार आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई येथील ‘रिंगण’ या संतविचाराला वाहिलेल्या वार्षिकाचे संपादक व युवा पत्रकार सचिन परब हे ‘गांधीजींना भावलेले तुकोबा’ या विषयावर बोलणार असून, तुकोबांच्या विचारांकडे गांधीजी कसे आकर्षित झाले व त्यांना कोणते विचार विशेष महत्त्वाचे वाटले याचा उलगडा करणार आहेत. सदभावना मंच अंतर्गत सुनिती सु. र. (पुणे), संपत देसाई (आजरा), सिरत सातपुते (मुंबई), इब नाहिम खान (पुणे) व सहकारी हे ‘गांधी आणि सामाजिक सदभावना’ या विषयावर चर्चा करतील. सामाजिक सदभावनेचा प्रश्न आज अधिक तीव्र झाला असताना, तो सोडविण्यासाठी गांधीजींचे मार्गदर्शन काय आहे यावर या सत्रात प्रकाश टाकण्यात येणार आहे.

तसेच राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व एस. एम. जोशी फाउंडेशनचे विश्वस्त प्रा. सुभाष वारे (अहमदनगर) हे ‘गांधीजी आणि समाजवाद’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. समाजवादी चळवळीवरील गांधीजींचा प्रभाव आणि गांधीवाद व समाजवाद यांचे नाते या सत्रात उलगडले जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अध्यासनाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार (कोल्हापूर) हे ‘गांधी आणि जातीव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, गांधीजी वर्णाश्रम धर्म व जातीव्यवस्थेचे समर्थक होते काय, याविषयी सखोल चर्चा करणार आहेत. बेळगाव येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक प्रा. आनंद मेणसे हे ‘समकालीन वर्तमान आणि गांधी-आंबेडकर विचार’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, आजच्या काळातील प्रश्नांना भिडताना गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कसे मार्गदर्शक ठरतात, याचे विश्लेषण करणार आहेत, अशी माहिती ऍड. परुळेकर यांनी दिली.

हा कार्यक्रम नि:शुल्क असून सहभागी होणाऱ्यांनी इतर व्यवस्थेसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर – ९४२२९४६२१२ व संजय आचरेकर ८४४६२६९७०४ यांच्याशी संपर्क साधावा, सर्व जिज्ञासूंनी व विचारप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page