अखेरच्या दिवशी कणकवलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी…

पंचायत समितीसाठी ६० ; तर जिल्हा परिषदेसाठी ३७ नामनिर्देशन..

⚡कणकवली ता.२१-: तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याने तालुक्यातील निवडणूक वातावरण तापल्याचे चित्र होते. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांसाठी तब्बल ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली आहेत.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी
होती. दिवसभर तहसील कार्यालय परिसरात गजबजलेले वातावरण पाहायला मिळाले. दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज घेऊन तहसीलदारांच्या कक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यालयातच थांबवून ठेवण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शिस्तबद्धपणे पार पडली. उद्या दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर वैध व अवैध अर्जांची स्पष्टता होणार आहे. या पुढील टप्प्यांमुळे कणकवली तालुक्यातील निवडणूक लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

नामनिर्देशन स्वीकारण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी व अंतिम यादीच्या टप्प्यांमुळे आगामी काळात कणकवली तालुक्यातील निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

You cannot copy content of this page