बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी श्यामसुंदर मांजरेकर इच्छुक…

⚡बांदा ता.१९-: बांदा शहर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी प्रभाग क्रमांक ४ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर इच्छुक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावेळी मांजरेकर यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यांना ग्रामस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा लाभल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा अनुभव, विकासकामांतील सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संपर्क यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाला विशेष पसंती दिली जात आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चांगली जाण आणि संघटनात्मक क्षमता यामुळे उपसरपंचपदासाठी ते योग्य उमेदवार मानले जात आहेत.
विद्यमान उपसरपंच आबा धारगळकर यांचा कार्यकाळ संपल्याने पक्षीय धोरणानुसार उपसरपंच बदल होणार आहे. सुरुवातीला जावेद खतीब, बाळू सावंत व तिसऱ्या वर्षी आबा धारगळकर यांना उपसरपंचपदी संधी देण्यात आली होती. त्यामुळे चौथ्या टर्मसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र मांजरेकर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे बांदा ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सलग ३५ वर्षे एकहाती सत्ता आहे. पक्षीय धोरणानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच उपसरपंच देण्याची परंपरा येथे कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा उपसरपंचपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
श्यामसुंदर मांजरेकर यांच्या इच्छुकतेमुळे उपसरपंच निवडीची चर्चा अधिकच वेग घेत असून अंतिम निर्णय पक्षीय पातळीवर कधी होणार, याची उत्सुकता शहरात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर उपसरपंच निवड होणार असल्याने आतापासूनच राजकीय घडामोडी वेगात सुरु आहेत.

You cannot copy content of this page