निरवडे गावाने दिलेली साथ कधीही विसरणार नाही…

अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांचा नागरी सत्कार; सैन्य दलातील जवानांचाही गौरव…

⚡सावंतवाडी,ता.१९-: भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष पदावर बसवून मोठी जबाबदारी दिली आहे, मात्र ही उंची गाठताना माझ्या निरवडे गावाने मला दिलेली साथ मी कधीही विसरू शकणार नाही. मी जरी शहराचा उपनगराध्यक्ष झालो असलो, तरी माझ्या निरवडे गावातील ग्रामस्थांसाठी आणि सुपुत्रांसाठी माझ्या कार्यालयाची दारे कोणतीही अपेक्षा न ठेवता सदैव उघडी राहतील. गावातील कोणत्याही व्यक्तीला शहरात काही अडचण आल्यास त्यांनी हक्काने माझ्याकडे यावे, तुमची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,असा भावनिक विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला. निरवडे येथील श्री साटम महाराज कलाक्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
आपल्या वकिली व्यवसायातील सुरुवातीच्या संघर्षाला उजाळा देताना निरवडेकर म्हणाले की, १९९७ साली जेव्हा मी सावंतवाडी सारख्या शहरात प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा त्या ठिकाणी अनेक दिग्गज वकील कार्यरत होते. एक नवीन वकील म्हणून व्यवसायात जम बसवणे आणि स्पर्धेवर मात करणे हे मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या काळात साधी किरकोळ कामे मिळणे सुद्धा कठीण होते, मात्र अशा परिस्थितीत माझ्या निरवडे गावातील लोकांनी मला कामे देऊन मोलाची साथ दिली. त्यांच्या विश्वासामुळेच मी आजपर्यंत वकिली व्यवसायात चांगली प्रगती करू शकलो आहे.​निरवडे गावातील युवकांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, या गावातील तरुण भारतीय सैन्य दलात भरती होत आहेत, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. गावातील तरुणांमध्ये मोठी ‘क्वॉलिटी’ असून त्यांनी केवळ नशिबावर अवलंबून न राहता सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी तरुण पिढीला दिला. उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना माझ्या गावाकडे पूर्ण लक्ष असेल. गावातील ग्रामस्थांनी शहरात आल्यावर काही अडचण असल्यास किंवा कामासाठी थेट सावंतवाडी नगरपालिकेत अथवा माझ्या कार्यालयात भेटावे, माझ्या कार्यालयाची दारे आपल्यासाठी कायम उघडी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. साटम महाराज कला क्रीडा मंडळाने केलेला हा सत्कार कायम स्मरणात राहील आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मी नेहमी सोबत असेन, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ​
याच कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या पियुष बर्डे आणि वेदांत पारकर यांच्यासह शरीरसौष्ठव स्पर्धेत यश मिळवलेले वासुदेव वैज आणि आरटीओ अधिकारी यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी सरपंच हरी वारंग, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते नागेश गावडे, नयनेश गावडे, पोलीस पाटील अजित वैज, संतोष गावडे, बाबल सावळ, प्रकाश माळकर, संजय तानावडे, रमेश बोंद्रे, दत्ताराम गावडे, सुनील माळकर,रोहन मल्हार यांच्यासह निरवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न सोनुर्लेकर यांनी केले, तर प्रमोद गावडे आणि हरी वारंग यांनीही आपल्या मनोगतातून अनिल निरवडेकर यांच्या कार्याचा गौरव केला.

You cannot copy content of this page