वेंगुर्ला येथे मच्छीविक्रेत्या महिलांचे मासे कचऱ्याच्या गाडीत टाकल्याने मच्छिमार बांधव आक्रमक…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला सुंदरभाटले ( ठाकरे शिवसेना कार्यालय समोर )येथे आज रविवारी दुपारी मच्छीविक्रीस बसलेल्या महिला व्यावसायिक यांच्या मासे च्या टोपल्या कर्मचाऱ्याकडून चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आल्याने महिला घाबरून गेल्या. यावेळी माहिती मिळताच त्वरित उभादांडा सरपंच निलेश चमणकर, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, मच्छिमार नेते दादा केळूसकर व वसंत तांडेल, वाल्मिकी कुबल, गणेश नार्वेकर, गजा कुबल, मणा कुर्ले, शेखर धावडे, सुरेश पोखरणकर, कृष्णा तोरसकर, संकेत तोरसकर आदी व उभादांडा, मूठ, कुर्लेवाडी, दाभोसवाडा येथील बहुसंख्य मच्छिमार बांधव यांनी एकत्र येत संबंधित कर्मचारी व मुकादमास जाब विचारला. यामध्ये तांडेल, तोरसकर, कुर्ले या मच्छीविक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. संबंधित महिला गोरगरीब असून त्यांना मुख्य मच्छिमार्केट मध्ये बसण्यास जागा देण्यात यावी व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांनी केली आहे. दरम्यान याबाबतचे आदेश नगराध्यक्ष वा मुख्याधिकारी यांनी (कोणी) दिले का? असा सवाल निलेश चमणकर यांनी उपस्थित केला आहे.तर याबाबत मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याशी संपर्क साधला असता संबंधिताना नुकसानभरपाई देण्यात येईल व संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्या सोमवारी नगराध्यक्ष व मच्छिमार बांधव यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर यांनी दिली. दरम्यान आमच्या मच्छिमार बांधव – महिला भगिनी यांच्यावर अशा प्रकारचे अन्याय होत असतील, तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page