९.२१ कोटींच्या योजनेतून देवगड–जामसंडेला पाण्याचा दिलासा…

दोन महिन्यांत नियमित पुरवठा:पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांची माहिती..

⚡देवगड ता.१४-: दीर्घकाळापासून अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या देवगड–जामसंडे शहराला येत्या दोन महिन्यांत नियमित, स्वच्छ व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची ठोस ग्वाही पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी राज्य शासनाकडून ९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शहरातील जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम वेगात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सध्या शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, आठवड्यात तीन दिवस पूर्ण पंपिंग तर चार दिवस रात्री पंपिंग सुरू आहे.
शहरातील पाणीपुरवठ्यातील मुख्य अडचण असलेल्या जुन्या पाईपलाईन बदलण्यासाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून ९.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण १३ किलोमीटर पाईपलाईनपैकी ८ किलोमीटर पाईपलाईन बदलण्याचे काम प्रस्तावित असून, आतापर्यंत २०० मीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७,८०० मीटरचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वेळवाडी सडा येथील ६ लाख ६७ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या लाईनचे काम सध्या सुरू असून, जामसंडेतील व्यापाऱ्यांचा विश्वास घेऊन हे काम केले जात आहे. ही टाकी कार्यान्वित झाल्यानंतर शहराला एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा शक्य होणार असून, ९४ लाईनसाठी निश्चित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
कुपलवाडी येथील पुलाच्या कामामुळे गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून, लवकरच बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याचेही सौ. चांदोस्कर यांनी सांगितले.
तसेच कुपलवाडी येथे पाणी साठवणुकीसाठी बंधारा बांधण्याचे नियोजन असून, शिरगाव–पाडाघर योजनेचे पाणी देवगड–जामसंडे शहराला देण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू आहेत. खाकशी पाईप्स बदलल्यानंतर लवकरच या योजनेचे पाणी शहराला उपलब्ध होणार आहे.
देवगड–जामसंडे शहरात सध्या एकूण ९६६ लाईन व ३०१५ नळ कनेक्शन असून, सभापतींसह समिती सदस्य संतोष तारी, सौ. रूचा पाटकर, लाईनमन व कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक लाईनवर व प्रत्येक नळधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हे काम प्रभावीपणे पूर्ण केले जाईल,” असे प्रतिपादन सौ. तन्वी चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेविका व समिती सभापती ऋचा पाटकर, गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, राजेद्र वालकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page