भाजप नगरसेविकांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका धडक..
मालवण दि प्रतिनिधी
मालवण मच्छी मार्केट मधील महिलांना चार दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मालवण मधील मत्स्य विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त करीत आज भाजपच्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने सौ. आचरेकर यांच्या समवेत मच्छी विक्रेत्या महिलांनी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन प्रशासनाने बजावलेल्या नोटीसांबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी मच्छी मार्केट मधील बांधले गेलेले ओटे चुकीच्या पद्धतीचे व संख्येने कमी असल्याने मच्छी विक्रेत्या महिलांना मार्केटमध्ये बसण्याची सक्ती करणे आणि मच्छी विक्रेत्यांच्या समस्या नगरपालिकेने न सोडविताच चुकीच्या पद्धतीने नोटीसा बजावल्या गेल्याचा आरोप सौ. आचरेकर यांनी करून नगरपालिकेच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी सौ. आचरेकर यांनी मच्छी विक्रेत्या महिलांवर अन्यायकारक कारवाई करू नये अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मालवणच्या नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी प्रशासनाने नोटीसा बजावल्या तरी मच्छी विक्रेत्या महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे.
दरम्यान, मच्छी मार्केट नूतनीकरणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी आम. निलेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही सौ. वराडकर यांनी सांगितले. तर नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांनी मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष वेधले जाईल अशी माहिती यावेळी मच्छी विक्रेत्या महिलांना दिली.
काही दिवसांपूर्वी मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी नगरसेवकांसमवेत मालवण मच्छी मार्केटमध्ये भेट देत मत्स्य विक्रेत्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या असतानाच मत्स्य विक्रेत्या महिलांना नगरपालिका प्रशासनाने नोटीसा बजावत अडथळा निर्माण करणारे साहित्याचा हटवावे, ८ जानेवारी पर्यंत अतिक्रमण दूर करावे, अन्यथा दांडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांबाबत मत्स्य विक्रेत्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आज भाजपच्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची भेट घेत कैफियत मांडत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, सन्मेष परब, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर तसेच शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेविका पूनम चव्हाण, मेघा गांवकर, नीना मुंबरकर, सहदेव बापर्डेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, नगरपालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने मंडईत नोटीस लावली. यामुळे मच्छीविक्रेत्या महिलांमध्ये घबराट पसरली. मच्छी मार्केट मधील मच्छीविक्रेत्या महिलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यवसाय करावा लागत आहे. मंडईत फक्त ६९ अधिकृत ओटे आहेत तर विक्रेत्यांची संख्या २५० हून अधिक आहे. उर्वरित महिलांनी व्यवसाय कुठे करावा, हा मोठा प्रश्न आहे. बाजार कराच्या पावतीवर तारीख आणि नगरपालिकेचा अधिकृत शिक्का नसतो, हा गंभीर प्रकार आहे. मार्केटला दरवाजा नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था, कचरा टाकण्यासाठी ट्रॉलीचा अभाव आणि सांडपाण्याच्या तुंबलेल्या गटारांमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसून संध्याकाळी पुरेशा प्रकाशाअभावी महिलांना अंधारात व्यवसाय करावा लागतो आहे, असे असताना प्रशासनाने कारवाईची बजावलेली नोटीस महिलांसाठी अन्यायकारक आहे, असेही सौ. आचरेकर म्हणाल्या.
मच्छी मार्केटमध्ये स्वच्छता राखणे गरजेचेच आहे. विक्रेत्यांना लाईट, दरवाजा, पाणी यासह ज्या सुविधा प्राधान्याने देणे गरजेचे आहे त्या देण्यात याव्यात. यासाठीचा प्रस्ताव तयार करून द्यावा. यासाठी आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही नगरसेविका सौ. आचरेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी कोणत्याही मच्छीविक्रेत्या महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळ तसेच अन्य शासकीय योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार निलेश राणेंना सादर करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले. तोपर्यंत तातडीने आवश्यक असलेल्या सुविधा आणि दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली जातील. तसेच मंडईत स्वच्छता राखण्यासाठी विक्रेत्यांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावर मत्स्य विक्रेत्या महिलांनी मच्छी मार्केट मधील अडगळ दूर करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगितले.
