तारामुंबरी वासियांकरिता स्वतंत्र लघु नळयोजना राबविण्याची मागणी…

सामाजिक कार्यकर्ते धनंजय जोशी यांनी दिले मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना निवेदन..

⚡देवगड ता.०५-:
देवगड–जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव येथील अत्यंत महत्त्वाच्या नळयोजनेची पाईप लाईन सध्या जीर्ण झाली असून ती वारंवार फुटत आहे. अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संपूर्ण देवगड शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पहिला मजला आणि उंच भागातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या श्री दिर्बादेवीमातेचे माहेरगाव अर्थात तारामुंबरी परिसरातील नागरिकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. तारामुंबरी गावातील विकासकामांसाठी देवगड–जामसंडे नगरपंचायतीला जोशी कुटुंबियांनी तारामुंबरी–मुरमणे येथील सर्व्हे नंबर ३८४ अ/२ मधील सुमारे ०३ गुंठे जागा विनामोबदला दिली आहे. या जागेचा उपयोग रस्ता रुंदीकरण, साकव बांधणे तसेच पाणीपुरवठा मार्गी लावण्यासाठी करण्याचा उद्देश आहे.

जामसंडे परिसरातील पावसाचे पाणी ज्या ओहोळाद्वारे वाहून थेट समुद्राला मिळते, त्या ओहोळाच्या अगदी लगत ही पाणवठा क्षेत्राची जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी लघु नळयोजना राबविण्यास योग्य परिस्थिती उपलब्ध आहे. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सध्या नगरपंचायतीच्या वतीने सुमारे २० ठिकाणी लघु नळयोजना यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

त्याच धर्तीवर तारामुंबरी–मुरमणे येथील जागेमध्ये स्वतंत्र लघु नळयोजना राबवून तारामुंबरी गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा, अशी ठाम मागणी तारामुंबरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय तुकाराम जोशी यांनी देवगड–जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा तारामुंबरी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page