Headlines

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाने तालुक्यात नुकसान

तर किनारपट्टी व मांडवी खाडीत पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

*वेंगुर्ला : प्रतिनिधी* शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने व जोरदार आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यामध्ये ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मिटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शहरातील मांडवी खाडी सह तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ताऊकती‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १४ मे पासून सर्तकतेचा इशारा दिला होता. वेंगुर्ला तालुक्यात १४ मे च्या सायंकाळपासून विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट होत होता. मात्र, मध्यरात्री मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यातच आलेल्या वादळी वा-याने झाडे पडण्याचे प्रकार घडले. वेंगुर्ला शहरामध्ये बॅ.खर्डेकर रोडवरील पुरुषोत्तम मडकईकर यांच्या घरावर नजिकचे आंब्याचे झाड पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले. तर याच घरालागून असलेल्या ‘राऊळ फोटो स्टुडिओ‘वरही सदरचे झाड पडल्याने छप्पराचे तसेच पावसाचे पाणी आत शिरल्याने संगणक, प्रिटर व इलेक्ट्राॅनिक साहित्यासह सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, आज सकाळी वेंगुर्ला तलाठी डी.बी.गोरड, कोतवाल मालणकर यांनी घटनास्थळी दाखल होत नुकसानीची पहाणी केली. उर्वरित घटनांमध्ये दाभोली नाका येथील हकीम नर्सरीत झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्या तुटल्या, मठ-टाकयेवाडी येथील सुनिता सावंत यांच्या घरावर झाड पडून नुकसान तर रावदस येथील रमेश बाळकृष्ण आंबोडसकर यांच्या घरातील विद्युत मीटर व टीव्ही विजेच्या धक्क्याने जळून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. समुद्र किनारपट्टीवर आणि वेंगुर्ला-मांडवी खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने किनारी राहणाऱ्या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिमारांनी आपल्या नौका खाडीत आश्रयाला आणल्या आहेत. मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे. तर बंदर परिसरात जोरदार लाटा उसळत आहेत.बंदर रोड येथे रोडला लागून संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू असून या कामात या उधाणामुळे व्यक्तय येत आहे. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या वादळी वा-यानंतर शहरासह पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील काही ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत झाला. तर काही ठिकाणी झालेल्या पडझडीमुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शुक्रवारी उशिरापर्यंत त्या जोडण्याचे काम सुरु होते.

You cannot copy content of this page