नगराध्यक्ष दिलीप गिरप:राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उत्साहात उदघाट्न..
⚡वेंगुर्ला ता.०२-: कलावलय संस्था गेली 29 वर्षे राबवित असलेले उपक्रम निश्चितच कौतुकास पात्र आहेत. यापुढे जास्तीत जास्त तरुणाईने सहभागी होऊन कलावलय हा वृक्ष मोठा करावा. वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे करीत असून जानेवारी – फेब्रुवारीत भव्य नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. कलावलय परिवाराने केलेला सन्मान निश्चितच लाखमोलाचा आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उदघाट्न ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर यांच्या हस्ते
वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात दीपप्रज्वलनाने झाले.
व्यासपीठावर नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, कलावलय चे अध्यक्ष बाळू खांबकर, सचिव संजय पुनाळेकर, स्वीटी यरनाळकर (समिता गुणे), परीक्षक श्रीनिवास नार्वेकर, परीक्षक प्रमोद लिमये, बी. के. सी. असोसिएशन चे अध्यक्ष सतीश डुबळे, जितेंद्र वजराटकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील 9 पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा मालक – संचालक यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर विजयकुमार फातर्पेकर यांचा कै. राजीव शिंदे कलावलय नाट्य गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दशावतार या वैभवशाली लोककलेचा विशेष गौरव आवश्यक असल्याचे बोलताना म्हटले. पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत विस्तृत मनोगत व्यक्त केले. दिलीप गिरप यांचा शाल, श्रीफळ, समूतिचिन्ह देऊन, गौरव राऊळ, साईश नाईक, सावंतवाडी येथील श्री. कुलकर्णी, सौ. कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील 9 पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचा सत्कार : यामध्ये आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी. आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ- मोचेमाड.वालावलकर दशावतार नाट्यमंडळ वालावल. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला.
स्वच्छ सुंदर वेंगुर्ला नगरीचे भूषण असलेल्या नाट्यगृहात आपला झालेला सन्मान हा मोठा आनंद होय. कलावलय चे संस्थापक यांची नाट्यचळवळीत मोठी कर्तबगारी राहिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास वैभव ठरत असलेल्या दशावतार कलेचा नाट्य मंडळाचा सन्मान निश्चितच चांगली बाब आहे. या लाल मातीने मला घडविले. दशावतारी सारखी एक वैभवशाली लोककलेचा अभ्यास करायला या कलेने शिकविले. पारंपरिक मंडळे व नवीन मंडळे पुढील पिढीला आदर्श देत राहतील. आज आपणास नाट्य गौरव पुरस्कार देऊन कलावलयने आनंद द्विगुणित केला आहे, असे यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर यांनी आपल्या सत्कारानंतर बोलताना केले.यावेळी कलावलयचे सदस्य, सातेरी देवस्थानचे दाजी परब, नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे, सीमा मराठे यांनी केले.
