⚡ओरोस ता १-: सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके यांना एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयाने त्याला 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ अन्वये कलम ७अंतर्गत कारवाई करण्यात आली असून १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अॅन्टी करप्शन ब्युरो, कुडाळचे पोलीस उपअधीक्षक विजय शिवराम पांचाळ (वय ५७), पोलीस उपअधीक्षक यांनी तक्रार दिली आहे. आरोपी पंकज विठ्ठल शेळके (वय ३२) हे सध्या रा. जय मल्हार सोसायटी, डॉन बॉस्को शाळेसमोर, मूळ रा. पलूस कॉलनी, तालुका पलूस, जिल्हा सांगली असे आहेत. आरोपीने आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार स्वप्नील गजानन ठाकूर यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजूर कर्जाच्या ३५ टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी एकूण २६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २२ हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहाथ सापडला.
या कारवाईत ५०० रुपयांच्या ४४ नोटा असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.५२ वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत सुरू आहे
बावीस हजाराची लाच घेताना उद्योग निरीक्षक पंकज शेळके लासलुचपतच्या जाळ्यात…
