गणेशनगर परिसरातील घटना: गाडीचे नुकसान; रस्ते व्यवस्थित होत नाहीत तोवर संबंधित ठेकेदाराला पुढील काम करू देऊ नका; नगरसेवक अजय गोंदावळे यांची मागणी..
⚡सावंतवाडी ता.०१-:
येथील गणेश नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ते व्यवस्थित न बुजविल्याने आज सायंकाळी पाचच्या सुमारास ह्युंडाई क्रेटा कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक अजय गोंदावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना धीर दिला.
यावेळी त्यांनी गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्यामुळेच अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचे स्पष्ट केले.
नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व संबंधित ठेकेदारांना तात्काळ नोटीस देऊन योग्य आदेश काढावेत, तसेच जोपर्यंत खोदण्यात आले रस्ते व्यवस्थित करत नाहीत तोवर पुढील काम करू देऊ नका, अशी मागणी श्री. गोंदावळे यांनी केली. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
