ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण: तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्या; ग्रामस्थांची मागणी..
⚡दोडामार्ग ता.२७-: मुळस–हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने थेट मानवी वस्तीतील गोठ्यांमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी मध्यरात्री शेतकरी मनवेल लोबो यांच्या गोठ्यात घुसून बांधलेल्या रेड्याची शिकार केली.
सकाळी गोठ्यात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत रेड्याचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात महिनाभरापूर्वीही वाघाने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.
वाघाचा वाढता वावर मानवी वस्तीजवळ होत असल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
