विशाल परब:पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले..
⚡सावंतवाडी,ता.२४-:
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता, अधिक जोमाने पक्ष संघटन आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना विशाल परब यांनी स्वतःच्या अनुभवाचा दाखला देत सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत मला अपेक्षित यश मिळाले नाही; मात्र त्यानंतरही माझे सामाजिक कार्य व जनसंपर्क मी थांबवलेला नाही. पराभवानंतरही जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सातत्याने मैदानात कार्यरत आहे. हीच जिद्द आणि सातत्य तुम्हीही दाखवावे.”
निवडणुकीतील जय–पराजय हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असून, मिळालेली मते ही जनतेने उमेदवारांवर दाखवलेला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन काम करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधताना विशाल परब यांनी त्यांच्या कष्टांचे कौतुक करत विश्वासाची थाप दिली. “थोड्या फरकाने विजय हुकला असला तरी जनतेने दिलेला कौल स्वीकारून खचून न जाता ‘फिनिक्स’प्रमाणे पुन्हा उभे राहा आणि अधिक ताकदीने कामाला लागा,” असे आवाहन त्यांनी केले.
या भेटीमुळे भाजपच्या गोटात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, पराभूत सहकाऱ्यांना धीर देण्याच्या विशाल परब यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळात विशेष कौतुक होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, पराभूत उमेदवारांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत, संकटकाळात नेतृत्व पाठीशी उभे राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले.

यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते
