⚡सावंतवाडी, ता. २२-:
शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक संजू परब यांनी केले.
याप्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, राजकीय मतभेद असले तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आज घेतलेली भेट ही प्रेमाची असून, विरोधक असलो तरी विकासासाठी सहकार्याने काम करू, असा शब्द त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.
या भेटीदरम्यान नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावले, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक उपस्थित होते.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगरसेवकांचे स्वागत करताना सांगितले की, नगरपालिकेकडून सर्व नगरसेवकांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल. तसेच लवकरच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा नगरपालिकेत औपचारिक सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जुने व नवे नगरसेवक एकत्र आल्याने सावंतवाडी शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
