पण कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाच्या निर्णयानंतर होणार अंतिम शिक्कामोर्तब..
ओरोस ता १९
कुडाळ तालुक्यातील पडवे सरपंच आनंद शंकर दामोदर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ३२८ विरुद्ध २०२ मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे सरपंच दामोदर हे अपात्र ठरले आहेत. दरम्यान, दामोदर यांनी या अविश्वास ठराव ग्रामसभे विरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या अपिलाबाबत निर्णयाला अधीन राहून निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अपात्र ठरलेल्या दामोदर यांच्या बाजूने न्यायालयाच्या बाजूने निर्णय झाल्यास त्यांचे सरपंच पद वाचू शकते. अन्यथा मतदानरूपी जनतेने दिलेल्या निर्णयानुसार ते अपात्रच राहणार आहेत.
कुडाळ तालुक्यातील पडवे सरपंच आनंद शंकर दामोदर यांच्यावर मनमानी कारभाराचा व अन्य आरोप करीत पडवे ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी गटविकास अधिकारी तथा अध्यासी प्रफुल्ल वालावलकर यांच्या उपस्थितीत ठरावाच्या बाजूने अथवा विरोधात यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. गावातील शाळेमध्ये सकाळी १०.३० वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. गावात एकूण १००२ मतदार आहेत. त्यातील ५४४ मतदारांनी मतदान केले. यानंतर मतमोजणी घेण्यात आली. यातील ३२८ मतदान ठरावाच्या बाजूने म्हणजेच सरपंच दामोदर यांच्यावर अविश्वास दाखविणारे मतदान झाले. तर २०२ मतदान ठरावाच्या विरोधात म्हणजेच सरपंच दामोदर यांच्यावर विश्वास दाखविणारे मतदान झाले.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच दामोदर यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे अपील दाखल केले होते. शुक्रवारी या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अविश्वास ठराव प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेने निर्णय देताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलावर होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून निकाल द्यावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे मतमोजणी संपल्यावर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी मतदारांनी केलेल्या मतदानानुसार सरपंच दामोदर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यानुसार ते सरपंच म्हणून कामकाज पाहण्यास अपात्र ठरले आहेत. परंतु कोल्हापूर खंडपीठाकडे याबाबत दाखल असलेल्या अपिलाचा निर्णय सरपंच दामोदर यांच्या बाजूने लागल्यास ते सरपंच पदी पुन्हा कार्यरत होऊ शकतील. दामोदर यांच्या विरोधात निर्णय गेल्यास आज घेण्यात आलेल्या मतदानात अपात्र ठरल्यानुसार ते सरपंच म्हणून पुढेही अपात्र राहतील, असा निर्णय दिला. त्यामुळे जनतेच्या निर्णयानुसार सरपंच दामोदर अपात्र ठरले असून त्यांच्या सरपंच पदाचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
