⚡कणकवली ता.१९-: येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या सरप्राईज व्हिजिटमुळे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
या भेटीदरम्यान जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी रुग्णालयातील एकूण कामकाजाचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, अधिकारी व कर्मचारी वेळेवर ड्युटीवर उपस्थित आहेत की नाही, ओपीडी वेळेत सुरू होते का, ऑक्सिजनची उपलब्धता, इनडोअर रुग्णांची व्यवस्था याची तपासणी करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले की, काही वेळा रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा आणि सुरू असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अशा अचानक भेटी आवश्यक असतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील परस्पर विश्वास (रॅपो) वाढवणे महत्त्वाचे असून त्यादृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सिटी स्कॅन मशीनचे अपग्रेडेशन सुरू असून येत्या दोन दिवसांत मशीन कार्यान्वित होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या तपासणीवेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, एम.डी. फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, डॉ. संजय चाटे, डॉ. माधव उबाळे, मेट्रन तिवरेकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स –
रुग्णांशी सौजन्याने वागा – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील
भेटी दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी उपस्थित डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. वेळेवर ड्युटीवर उपस्थित राहणे, रुग्णांशी सौजन्याने वागणे, रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार देणे तसेच आजारांचे अचूक निदान करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
बॉक्स-
स्वच्छतेअभावी जिल्हा शल्यचिकित्सकांचा संताप, कर्मचाऱ्यांना ‘डोस’
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट देण्यामागे स्वच्छतेची पाहणी हाही एक महत्त्वाचा उद्देश होता. मात्र रुग्णालय परिसर व स्वच्छतागृहांची पाहणी केल्यानंतर डॉ. श्रीपाद पाटील यांनी स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या शब्दांत कडक सूचना देत तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले.
