आमदार निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन..
कुडाळ : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन साळगाव येथील ‘प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात’ आयोजित करण्यात आले असून, याचे उद्घाटन १२ डिसेंबर रोजी होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाची सांगता १५ डिसेंबर रोजी होणार आहे.
गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत कमळकर, साळगाव येथील जयहिंद गंगोत्री संस्थेचे डॉ. किरण ठाकूर, शिक्षणाधिकारी माध्य. कविता शिंपी आणि साळगावच्या सरपंच अनघा दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिवशी प्रामुख्याने वैज्ञानिक प्रतिकृतींची मांडणी आणि शैक्षणिक प्रतिकृतींचे परीक्षण केले जाईल.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या टप्प्यात, १५ डिसेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक भूषविणार आहेत. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून साळगावच्या जयहिंद ग्रामोन्नती संस्थेचे सचिव पंढरी पुंडलिक परब आणि लोकमान्य एज्युकेशन कोकण विभागाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे कुतूहलाने बघावे आणि त्यांच्यातील संशोधक वृत्ती वाढीस लागावी, हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. तरी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमोद रवींद्र धुरी अध्यपक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर सदानंद शारबिद्रे आणि कुडाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले आहे.
