अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड ..
ओरोस ता १६
अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध झाल्या आहेत. महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, निवडीत नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर भाजपच्या वरिष्ठांनी केला. चर्चेत असलेल्या सर्व सदस्यांना डावलून भाजपने बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांना अध्यक्ष पदासाठी संधी दिली. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेने पावसी मतदार संघाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांना संधी दिली. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामुळे तीन वर्ष ३६० दिवसांनी जिल्हा परिषदेत लोकनियुक्त राजवट सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत २० मार्च २०२२ रोजी लोकनियुक्त प्रशासनाची राजवट संपुष्टात आली होती. २१ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू झाली होती. त्यानंतर आजपर्यंत प्रशासकीय राजवट लागू होती. जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली होती. या निकालात भाजपचे २७, एका पुरस्कृत सदस्यांसह शिंदे शिवसेनेचे १४, ठाकरे शिवसेनेचे तीन आणि अपक्ष सहा असे सदस्य निवडून आले होते. यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. सोमवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढलेल्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कालावधी होता. दुपारी १२ वाजल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित सदस्य दाखल झाले. त्यांच्या सोबत अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल हे उपस्थित होते. त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते यांच्यासह महायुतीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, तालुका सभापती उपस्थित होते.
यानंतर प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी तर दादा साईल यांनी उपाध्यक्ष पदासाठी पीठासन अधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केले. कामत यांच्यासाठी प्रमोद रावराणे आणि साईल यांच्यासाठी दीपलक्ष्मी पडते यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी दुपारी ३ ते ३.३० वाजता अर्ज छाननी आणि अर्ज माघारी प्रक्रिया तसेच त्यांनतर प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची खास सभा सुरू झाली. या सभेला सर्व ५० सदस्य तसेच आठ तालुक्यांचे आठ सभापती उपस्थित होते. पीठासन अधिकारी शुभांगी साठे यांनी अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी तुकाराम साईल यांचा एकच अर्ज आल्याचे सांगत त्यांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर होताच सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषद परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांचा गजर सुरू झाला. यावेळी जिल्हाभरातून महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, ज्येष्ठ सदस्य संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, प्रितेश राऊळ, सावी लोके, सोनाली घाडीगावकर, संतोष साटविलकर, भाजप गटनेते संजय बोबडी, शिंदे शिवसेना गटनेते केशव नारकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास गटाचे गटनेते नितीन राऊळ यांच्यासह अन्य नवनिर्वाचित सदस्य, आठही तालुक्यांचे सभापती उपस्थित होते. यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या दालनात त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
