⚡देवगड ता.१६-:
माजी खासदार व कुडाळ–मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके यांनी दिली.
या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे यासाठी देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे श्री देव कुणकेश्वराच्या चरणी अभिषेक करण्यात येणार आहे.
त्यानंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचेही अमोल लोके यांनी सांगितले.या कार्यक्रमांला देवगड तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
