मळगाव इंग्लिश स्कूलचा २८ डिसेंबर रोजी भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…

जुने मित्र व जुन्या आठवणींना नवा उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र:शाळेच्या प्रांगणात रंगणार आनंद, उत्साह आणि स्नेहाचा महोत्सव;मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजन..

सावंतवाडी ता.१०-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे रविवार २८ डिसेंबर रोजी, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जीवनाच्या धकाधकीत पुढे जाताना शालेय जीवनातील निरागस क्षण, मित्रमैत्रिणींची साथ, शाळेतील बाकांवरची मैत्री, शिक्षकांचे संस्कार आणि शाळेमधील हसरे दिवस पुन्हा एकदा अनुभवण्याची सुवर्णसंधी मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना या सोहळ्याच्या निमित्ताने मिळणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत रंगणारा हा सोहळा शाळेच्या प्रांगणात आनंद, आठवणी आणि उत्साहाचा दरवळ पसरवणार आहे.

स्नेहमेळाव्याने साजरा होणार जाणार ‘आठवणींचा आठवणींचा उत्सव

हा सोहळा केवळ कार्यक्रम नसून, माजी विद्यार्थ्यांच्या मनाला भिडणारा भावनिक ‘आठवणींचा उत्सव’ ठरणार आहे. कित्येक वर्षांनी भेटणारे वर्गमित्र, कट्ट्यावरच्या गप्पांचे पुनरुज्जीवन, शाळेच्या दालनात घुमलेले हास्य आणि शिक्षकांच्या तंबी-प्रोत्साहनांनी परिपूर्ण दिवस हे सगळं पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी सर्वजण एका छताखाली एकत्र येणार आहेत.

बळकट होणार माजी विद्यार्थी स्नेहबंध, जुन्या शिक्षकांचा होणार सामूहिक सत्कार

माजी विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, प्रशालेच्या विकासात त्यांचा सहभाग वाढावा, आणि वर्तमान विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवांचा ठेवा मिळावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, अनेक वर्षांपासून आपल्याला घडविणाऱ्या जुन्या शिक्षकांचा सामूहिक सत्कार करून त्यांना कृतज्ञतेची मानवंदना देण्याची संधीही माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आकर्षक आयोजन

स्नेहमेळाव्याची सुरुवात सकाळी ९ वाजता उपस्थिती नोंदवून होणार आहे. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन, स्वागतपर भाषण माजी विद्यार्थ्यांचे मुक्त संवाद सत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव-सत्कार आणि स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

माजी विद्यार्थ्यांना उत्कट आवाहन

सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात मळगाव इंग्लिश स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींची पुन्हा नव्याने उजळणी करण्याची ही संधी गमावू नये, असे आवाहन माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page