क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्मृती लीला’ पुरस्कार जाहीर…

रवींद्र तळाशीलकर ; १७ मार्च रोजी गौरव सोहळा…

⚡मालवण,ता.१४-:
सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण स्पोर्ट असोसिएशन आणि हडकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित तसेच सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत ‘स्मृती लीला पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू गुणवंत व्यक्तिमत्त्वांना दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सोहळा १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भरड येथील लीलांजली हॉल येथे होणार आहे अशी माहिती सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी दिली.

कै. लीलाधर गणेश हडकर यांना क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस अशा विविध खेळांची प्रचंड आवड होती. त्यांनी खेळाडू म्हणून जपलेली मैत्री आणि आपुलकी आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मरणात आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी या पुरस्काराची परंपरा सुरू करण्यात आली.

यावर्षी ज्येष्ठ क्रीडापटूंच्या श्रेणीत भारताचे माजी कसोटीपटू पांडुरंग महादेव साळगावकर (देवबाग), सत्यविजय जयराम चिंदरकर, उत्तम भिवा नेमळेकर, मिनीन मनवेल फर्नांडिस (व्हॉलीबॉल खेळाडू) या खेळाडूंसोबतच शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील उदयोन्मुख खेळाडूंनाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नगराध्यक्षा ममता वराडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब गोवेकर, सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर आणि मालवण स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.
या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीला देवदत्त (भाऊ) हडकर, सागर हडकर, यजुवेंद्र हडकर, श्रीमती अंजली हडकर, महेश जावकर, राजेंद्र आंबेरकर, अजय शिंदे, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, पंकज पेडणेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, बाळू मुणगेकर आणि सौ. नंदिता राजेश पाटील यांच्यासह हडकर कुटुंबीय उपस्थित होते.
क्रीडा प्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page