ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे सन्मान..

⚡मालवण ता.१४-:
अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्यकलाकार श्री. आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे नटवर्य कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता सामंत, नगराध्यक्ष ममता वराडकर, ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी, सुधीर कुर्ले, अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, परीक्षक संजय धूपकर, भाई शेवडे आदी उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना शाल, श्रीफळ, गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रतिलाल तारी यांच्या पत्नी सौ. राजश्री तारी यांचा मानाची साडी, ओटी व मोत्याचा हार प्रदान करून सौ. आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दत्ता सामंत यांनी विचार मांडताना रतिलाल तारी यांचा गेल्या पन्नास वर्षातील कला क्षेत्रातील वावर वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी अनेक कलाकारांना मार्गदर्शन केले असून समाजहिताचे कार्यही केले आहे. त्यांच्या या कार्याची पोचपावती अष्टपैलू कलानिकेतन संस्थेने आज त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून दिली आहे, असे सांगितले. तर नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनीही ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाबद्दल अष्टपैलू कलानिकेतनकडून होणाऱ्या गौरवाबद्दल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी रतिलाल तारी यांनी पुरस्काराबद्दल संस्थेचे आभार मानले.

पुरस्कार गौरवपत्राचे वाचन महेश धामापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले. आभार सुधीर कुर्ले यांनी मानले. यावेळी नगरसेविका महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, अनिता गिरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह अष्टपैलू कलानिकेतनचे सदस्य, कलाकार मंडळी व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page