कोमसापच्या नाट्यअभिवाचन स्पर्धेत समीक्षा फडके प्रथम…

कुडाळ हायस्कूल स्पर्धा संपन्न..

कुडाळ : को.म.सा.प. शाखा कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नाट्य अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत समीक्षा फडके हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य डॉ.विपिन वराडे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, को.म.सा..प. केंद्रीय समन्वय समिती सदस्य आनंद वैद्य कुडाळ शाखा अध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर, सचिव सुरेश पवार , लेखिका डॉ.सौ.दीपाली काजरेकर, प्रा.अरुण मर्गज, कवयित्री सौ.स्वाती सावंत, लेखिका सौ. स्नेहल फणसळकर, उपप्राचार्य नारायण साळवी, कोषाध्यक्ष गोविंद पवार व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा… या केशवसुतांच्या रचनेचे महत्त्व पटवून देत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य डॉ.विपिन वराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पवार यांनी केले, व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन उपप्राचार्य श्री. साळवी यांनी स्वागत केले. को.म.सा.प शाखा कुडाळ, तालुक्यातील बहुतांशी शाळांमध्ये अभिवाचन उपक्रम राबवणार असल्याचे प्रा.संतोष वालावलकर यांनी यावेळी सांगितले. कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये को.म.सा.प. या संस्थेने पहिले पुष्प गुंफून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पहिल्या पुष्पाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी आनंद वैद्य यांनी केले. विद्यार्थ्यांना अशा अभिनव कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या कौशल्यांकडे व शैक्षणिक उन्नतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी उद्घाटनपर मनोगतामध्ये सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा परिचय नव्या पिढीला देण्यासाठी को.म.सा.प.प्रयत्नशील असल्याचे सांगून को.म.सा.प. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी या उपक्रमाला व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
नाट्य अभिवाचन स्पर्धेचा अनुक्रमे निकाल पुढीलप्रमाणे कु. समीक्षा फडके (प्रथम क्रमांक), कु. कस्तुरी राऊळ (द्वितीय क्रमांक), कु. हेमांगी मेतर (तृतीय क्रमांक) या यश संपादन केलेल्या अभिवाचकांना को.म.सा.प.तर्फे बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी पार पडली. परीक्षक म्हणून डॉ.दीपाली काजरेकर, प्रा. अरुण मर्गज, सौ.स्नेहल फणसळकर यांनी काम पाहिले. यशस्वी विद्यार्थिनींचे कुडाळ हायस्कूल जुनिअर कॉलेज कुडाळचे पदाधिकारी, संस्था पदाधिकारी आदींनी कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गोविंद पवार यांनी मानले.

You cannot copy content of this page