युवक -युवती दोघेही कणकवलीतीलच..
कणकवली : तालुक्यातील तरंदळे येथील तलावात युवक व युवतीचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास ही माहिती कणकवली पोलिसांना मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. पोलिसांनी दोघांना बाहेर काढून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकानी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मृत झालेल्यांमध्ये युवती ही इयत्ता बारावीची विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, युवक व युवती दोघांनीही एकमेकांना पकडून तलावात उडी घेतली असावी, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कणकवली पोलीस पुढील तपास करत आहेत.
