नम्रता, प्रेम असेल तर कुणालाही आपलेसे करता येते…

डॉ. गिरीष ओक:बॅ. नाथ पै सेंट्रल स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

कुडाळ : अंगी नम्रता, प्रेम असेल तर या जगात कोणालाही आपलेसे करता येते. राहतो तो देश, करतो ते काम आणि संपर्कात येईल त्या माणसावर प्रेम केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्यातील कलागुणावर श्रद्धा विश्वास ठेवून प्रेम करा. म्हणजे त्यातून तुमच्यातील उद्याचा कलाकार प्रकाशमान होईल. असे उद्गार सुप्रसिद्ध सिनेन -नाट्य अभिनेते गिरीष ओक यांनी काढले. बॅ. नाथ पै सेंटर स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
डॉक्टर गिरीष ओक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माधव बापट, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे आई वडील, त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, महिला, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, बी.एड च्या माजी प्राचार्य डॉ. दिपाली काजरेकर, प्रा अनुष्का रेवणकर, पालक शिक्षक पालक संघाचे विठोबा सावंत, संतोष वालावलकर, डॉ. जी.टी. राणे, डॉक्टर सिद्धेश बांदेकर, पल्लवी कामत, इत्यादी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संदेश देताना डॉ। गिरीश ओक म्हणाले, आपल्यातल्या कलागुणांना, कलावंताला ओळखा. त्याला खत पाणी घाला. आणि ही संधी शाळा कॉलेजमधून मिळते, त्याचं सोन करा. स्वतःला सिद्ध करा. स्नेहसंमेलन हे त्याचे फार मोठे व्यासपीठ आहे. त्याचा येथोचित उपयोग करा.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर सारखे कलासक्त, नवीन व्हिजन घेऊन काम करणारे चेअरमन आपणास लाभलेले हे आपले भाग्य समजा. उमेश गाळणकर यांची व आमची झालेली ओळख, मैत्री हे आपले पूर्व सुकृत आहे, असे मी समजतो. या कुडाळच्या सागर मातीच्या शिंपल्यातील एक अमूल्य मोती म्हणजे उमेश गाळवणकर, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ठिकाणी असलेली नम्रता,सकारात्मक विचार,कलात्मक दृष्टी, आतित्थशीलता,जिद्द,आपुलकी, प्रेम, विकासाचा ध्यास आणि गरिबाबद्दल असलेला कळवळा यामुळे आमच्यासारख्या अनेक कलावंतांचा, इतर थोर व्यक्तींचा आपणास सहवास लाभतो. ते आपले भाग्य समजा, असे सांगत संस्थेच्या, शाळेच्या बदललेल्या कॅम्पसच्या ऊर्जस्वल परिसराचे श्रेय उमेशला असल्याचे सांगत तेथील शाळा ही संस्था कुडाळच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ठरली असल्याचे नमूद करीत वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छोट्या मुलांना या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल शिक्षकांचे व मुलांना सहभागासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करीत कलाकार विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशेष प्राविण्य प्राप्त कलावंत विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मनोगत करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या जीवनातील या महत्वपूर्ण सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. आणि ज्या कलावंतांच्या आम्ही चहात्या होते ते डॉक्टर गिरीश ओक यांच्या हस्ते आपल्या सत्कार होतो आहे, त्यांच्यासोबत कला आनंद घेता येतो आणि फार आनंदाची बाब असल्याचे नमूद करीत कोरोना काळातील या संस्थेने सामाजिक बांधिलकीने केलेल्या कामगिरीचा सुद्धा त्यांनी गौरव केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. यावेळी विद्यार्थी,शिक्षक पालक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पूर्ण वेळ या स्नेहसंमेलनातील दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

You cannot copy content of this page